अलिबाग- समाजातील शेवटच्या घटकाला अर्थ साक्षर करण्यासाठी ‘महामनी’या वित्तीय साक्षरतेवर काम करणाऱ्या मुंबईस्थित मल्टीमिडिया कंपनीने २० जानेवारी रोजी अलिबागमधील सारळ गावात ‘पैशांवर बोलू काही’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. सारळ आणि परिसरातील महिला बचत गटांच्या शेकडो महिलांनी या कार्यशाळेतून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवले. दैनंदिन जीवनातील बचत आणि गुंतवणुकीच्या सोप्या टीप्स महामनी मधील तज्ज्ञांनी स्लाईड शोसह सोप्या भाषेत सादर केली.
सारळ मधील जिल्हा परिषद शाळेमध्ये दुपारी ३ वाजता महामनीची ‘पैशांवर बोलू काही’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. सारळच्या ग्रामसेविका निशा चंदनकर यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला तर सरपंच अमृता नाईक आणि समाज सेविका शर्मिला कुन्नुमल यांनी महामनीमधील सदस्यांचे स्वागत केले.
‘पैशांवर बोलू काही’ या कार्यशाळेची सुरुवात महामनीच्या ऋुजुता लुकतुके यांच्या सादरीकरणाने झाली. वित्तीय सेवा क्षेत्रात दिर्घकाळ काम करणारे अर्थ सल्लागार दत्तात्रेय काळे यांनी दिर्घकाळ संपत्ती निर्मितीचे विविध पर्याय, म्युच्युअल फंड, शेअर मार्केटमधील गुंतवणूक, विम्याचे महत्व यासारख्या विषयांचे सोप्या भाषेत सादरीकरण केले. सोबतच महामनी टीम अंकुश बोबडे, कैलास रेडीज यांनी महिलांनी डिजिटल बँकिंग सेवा कशी वापरावी, कोणत्या सेवा बँकांकडून दिल्या जातात, डिजिटल गोल्ड या नव्या गुंतवणूक पर्यायाची माहिती दिली. सायबर हल्ले आणि ऑनलाईन होणारी आर्थिक फसवणूक कशी टाळावी या विषयी खबरदारीचे उपाय सांगितले.
आयुष्यातील दुर्लक्षित पण भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या आर्थिक प्रश्नांबाबत माहिती मिळत असल्याने तब्बल तीन तास सारळमधील महिलांनी एकाग्रतेने माहिती ऐकली. ग्रामपंचायत सारळ आणि महामनी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.