मुंबई : मुंबई महानगरपालिकेची प्रभाग संख्या 227 वरुन 236 पर्यंत वाढवण्याचा निर्णय बदलत राज्य सरकारने जारी केलेल्या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी याचिका दाखल करत यासंदर्भात सुनावणी देण्याची विनंती केली.त्यानंतर मुंबई पालिका प्रभाग रचना आव्हान याचिकेवर राज्य सरकारला 25 नोव्हेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाबाबत 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे.
शिवसेनेतून शिंदे गटाने बंड पुकारून भाजपसोबत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या नव्या सरकारने मविआ सरकारच्या प्रभागांच्या सीमा रचनेबाबत घेतलेला निर्णय 8 ऑगस्टच्या बैठकीत रद्द करून पालिकेच्या प्रभागांची संख्या 236 वरून पुन्हा 227 करत तसा अध्यादेश जारी केला.या अध्यादेशाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्यांना याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे सूचित केले होते. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती आर. डी. धनुका आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर खंडपीठाने सुनावणी घेण्यास नकार देत दुसऱ्या खंडपीठासमोर दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्या पेडणेकर यांना दिले.याबाबत आता मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली आहे.दरम्यान याप्रकरणी न्यायालय काय निर्णय देते, त्यावर महापालिकेचे भवितव्य ठरणार आहे.