मुंबई: -डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज लाखो भिमसैनिक चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत. मागील दोन वर्षात कोरोना संकट असल्यामुळे देशभरातील अनुयायांना चैत्यभूमीवर येता आले नाही. त्यामुळे यंदा मोठ्या संख्येने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत. या अनुयायांसाठी मुंबई पालिका, रेल्वे प्रशासनाकडून तसेच बेस्ट वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह विविध ठिकाणी नागरी सेवासुविधा उपलब्ध केल्या आहेत.यामध्ये तात्पुरता निवारा, शामियाना, व्हीआयपी कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह मोबाईल चार्जिंग सुविधा आदी सुविधांचा समावेश आहे.या अनुयायांनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने देखील भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये भला मोठा मंडप घालण्यात आला असून येणाऱ्या सर्वांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. एकाच तिकिटात संपूर्ण मुंबईत प्रवाशांना फिरता यावे म्हणून बेस्टने ५० व ६० रुपयांची दैनिक पास योजना सुरू केली आहे. दैनिक पास प्रवाशांना ५ ते ७ डिसेंबर दरम्यान शिवाजी पार्क येथून खरेदी करता येणार आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून मोफत बस टूर सुरू केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबईतील चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वडाळा, बीआयटी चाळ (परेल) आणि सिद्धार्थ कॉलेज (फोर्ट) अशा महत्त्वाच्या ठिकाणी मोफत बस टूरने भेट देता येणार आहे.