रियो : कतार फिफा विश्वचषक २०२२च्या सामन्यांनी चाहत्यांना रोमांचित केले असतानाच एका बातमीने संपूर्ण फुटबॉल जगताला चिंतेत टाकले आहे. फुटबॉल इतिहासातील महान खेळाडू ब्राझीलचा माजी दिग्गज स्ट्रायकर पेले यांची प्रकृती खालावली आहे. एका अहवालानुसार, कॅन्सरच्या उपचारासाठी सुरू असलेल्या केमोथेरपीचाही त्याच्यावर परिणाम होत नसल्याचे समोर आले आहे. पेले याना सध्या पॅलिएटिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे सध्या ते तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. तर दुसरीकडे जगभरातील फुटबॉलप्रेमी आणि चाहते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
८२ वर्षीय पेले यांना मंगळवारी २९ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी काळजीचे कारण नाही, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना पुन्हा साओ पाउलो येथील अल्बर्ट आइनस्टाइन रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून, ते रुग्णालयात उपचार घेतील, असे सांगण्यात आले होते. मात्र आता रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले की, केमोथेरपीला ते प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळं त्यांना तात्काळ पॅलिएटिव्ह केअरमध्ये ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, कतारमधील ब्राझीलच्या चाहत्यांनी पेलेचे चित्र असलेले बॅनर लावले असून, त्यावर लवकर बरे व्हा! असे लिहिले आहे. तर जगभरातील त्याच्या चाहत्यांकडून त्याच्यासाठी प्राथर्ना करण्यात येत आहे. फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलियन एमबाप्पेने एक ट्विट करत बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या, आणि फुटबॉलच्या किंगसाठी ही प्राथना असल्याचे म्हटले आहे.