नवी दिल्ली : – भारतीय इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार, १ मार्चपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ झाली. याशिवाय १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही तब्बल ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली. महागाईने आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले असतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने सर्व सामान्यांना मोठा झटका बसला आहे.
मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत आधी १०५२.५० रुपये होती. आता हा सिलिंडर ११०२.५ रुपयांना मिळणार. मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर १७२१ रुपयांना मिळत होता. तो आता २०७१.५ रुपयांना मिळणार. दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडर आता २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर ११०३ रुपयांना मिळणार आहे. नवीन दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली. या निर्णयामुळे स्वयंपाक करण्यासाठी घरगुती तसेच रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या खर्चात वाढ होईल.
गेल्या चार महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या नव्हत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारीमध्ये देशाचा अर्थसंकल्प मांडल्यानंतर महागाईपासून दिलासा मिळेल अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने या आशेवर पाणी फेरले गेले. नियमानुसार जर तुम्ही सबसिडी घेतली असेल तर घरगुती गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे १२ सिलेंडर सबसिडाइज्ड रेटमध्ये अर्थात सवलतीच्या दरात मिळतील. तर अतिरिक्त सिलेंडरसाठी घरगुती वापराच्या सिलेंडरचे नवे दर लागू होणार आहेत.