संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

मविआ सरकारच्या काळातच टाटाचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर! उदय सामंतांचे विधान

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि टाटा-एअरबस हे प्रकल्पसुद्धा गुजरातला गेले. महाराष्ट्रातून एकूण तीन प्रकल्प गुजरातला गेल्याने आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच महाविकास आघाडीच्या काळातच टाटा -एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला असल्याचे आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.याशिवाय काही दिवसांतच वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येईल,असे सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले की, मागील आठ महिन्यांत हाय पॉवर कमिटीची मीटिंग झाली नाही. तर ती 15 जुलै रोजी झाली. पण त्यानंतर तळेगावला गेल्यावर लक्षात आले की जी जमीन आम्ही वेदांता-फॉक्सकॉन या प्रकल्पासाठी देणार होतो, त्या जमिनीवर साडेतीन हजार एकरवर इको-सेन्सिटिव्ह झोन आहे आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेला आहे. त्यामुळे ती जमीन प्रकल्पासाठी देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचसोबत त्या जमिनीचे सर्व कागदपत्र पूर्ण करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षांचा काळ लागतो आणि हे वेदांताच्या मालकाला माहीत असल्याचे उदय सामंत म्हणाले.दरम्यान, पुढे उदय सामंत म्हणाले, आपण स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचे नाही. आधीच महाराष्ट्रातून जे प्रकल्प बाहेर गेले आहेत. त्याचे खापर आमच्यावर फोडायचे. त्याबद्दल आता चर्चा करायची आणि संभ्रमावस्था निर्माण करायची हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून एअरबस प्रकल्पाबाबत काही लोक बोलत आहेत. स्टेटमेंट करत आहेत. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला.

एअरबस प्रकल्पासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रातील नागपूरमध्ये आणण्यात येईल, असे मी म्हणालो होतो. पण त्या वेळी संबंधित यंत्रणांकडून मला जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार तेव्हा मी तसे म्हणालो होतो. एखादा प्रकल्प राज्यात येत असेल तर उद्योगमंत्री म्हणून मी काही चुकीचे बोललो असे मला वाटत नाही. पण त्यानंतर मी वस्तुस्थिती पाहिली तेव्हा समजले की 21 सप्टेंबर 2021 रोजी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणा यांचा सामंजस्य करार झाला होता. सामंजस्य करार झाला म्हणजेच प्रकल्पाची जागासुद्धा निश्चित झाली आहे, असा अलिखित नियम आहे. त्याचे 30 ऑक्टोबरला भूमिपूजन असताना काही मंडळी असे म्हणतात की मागील दोन ते महिन्यात महाराष्ट्रातील एअरबस हा प्रकल्प गुजरातला गेला. दरम्यान, जमिनीची पाहणी करून एखाद्या प्रकल्पासंबंधित डिफेन्सशी संबंधित परवानगी मिळविणे हे काही 90 दिवसांत शक्य नाही आणि म्हणून टाटा एअरबस हा प्रकल्प महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाणार हे एका वर्षांपूर्वीच ठरले होते. हे अनेकांनी माध्यमातून सांगितले आहे. पण हे सर्व स्वीकारायचे नाही, असा टोला उदय सामंत यांनी विरोधकांना लगावला आहे. येत्या काही दिवसांत वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असून त्याबाबत सविस्तर माहिती थोड्या दिवसात देऊ.त्यामुळे विरोधकांनी आमच्या स्वागतासाठी शाल आणि श्रीफळ घेऊन तयार रहा.प्रकल्प आल्यानंतर आपोआपच विरोधकांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लागतील, असे सामंत म्हणाले.

महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सामंत तुम्ही उद्योगमंत्री आहात की कोण असा संतप्त सवाल केला आहे. याशिवाय दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवला असेही पेडणेकर म्हणाल्या आहेत. देशातील सर्व संपत्ती एका राज्यात घेऊन जात आहेत त्यामुळे गुजरात एक वेगळा देश निर्माण करायचा आहे का? असा सवाल सतेज पाटील यांनी केला आहे. प्रकल्प पळवण्यासाठीच सत्तातराचा घाट घातला असा आरोप माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. याशिवाय डबल इंजिन असताना महाराष्ट्रात प्रकल्प कसे येत नाही.उद्योजकांचा खोके सरकारवर विश्वास नसल्याचा टोला माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.या प्रकरणावरुन आमदार प्रसाद लाड महाविकास आघाडीवर टीका करताना शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सुभाष देसाई येणाऱ्या प्रत्येक उद्योजकांकडे किती टक्के मागत होते हे त्यांनी आधी सांगावे. भूषण देसाई टक्केवारीसाठी दुबईमध्ये कशा बैठका घेत होते हे त्यांनी आधी सांगावे. मातोश्रीला किती टक्के पोहोचायचे हे देसाई यांच्याकडून सांगितले पाहिजे असा आरोप लाड यांनी केला.

दरम्यान, टाटाचा प्रकल्प नागपुरमध्ये व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आग्रही होते. नागपूरला टाटा समुहाचे हब बनवण्याची विनंती करणारे पत्र 7 ऑक्टोबर रोजी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिले असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय हा प्रकल्प नाशिकमध्ये यावा यासाठी 2021 मध्येच पत्रव्यवहार केल्याचे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami