मुंबई- मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते मशीद बंदर दरम्यानचा कर्नाक पूल पाडण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी आणि रविवारी २७ तासांचा जंम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री ११ पासून तो सुरू होईल. रविवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालेल. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील १,०९६ लोकल आणि ३६ मेल व एक्सप्रेस रद्द केल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट आणि एसटी महामंडळ जादा बस चालवणार आहेत.
सीएसएमटी जवळचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे तो पाडला जाणार आहे. या शिवाय कोपरी येथील उड्डाणपुलासाठी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री मुलुंड ते ठाणे दरम्यान विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्नाक पूल पाडण्यासाठी १९ आणि २० नोव्हेंबरला २७ तासांचा मेगाब्लॉक आहे. मुख्य मार्गावर १७ तासांचा आणि हार्बर मार्गावर २१ तासांचा हा ब्लॉक आहे. या काळात सीएसएमटी ते भायखळा दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहणार आहे. भायखळा ते कल्याण ही उपनगरी सेवा सुरू राहणार आहे. त्यात काही गाड्या दादरपर्यंत चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे. शनिवारी रात्री ११ वाजता हा ब्लॉक सुरू होईल आणि रविवारी रात्री ८ वाजता संपेल. यामुळे मध्य आणि हार्बरच्या १,०९६ लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. ३६ मेल आणि एक्सप्रेस रद्द केल्या असून ६८ मेल आणि एक्सप्रेस दादर, पनवेल, पुणे आणि नाशिक स्थानकांपर्यंत चालवल्या जाणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी आणि बेस्ट जादा बसेस चालवणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने म्हटले आहे.