संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 27 September 2022

मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही – संजय राऊत

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. एकनाथ शिंदे हे पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगत होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात अस्वस्थता पसरलेली असतानाच शिवसेनेचे ११ आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. नॉट रिचेबल असलेले सर्व आमदार हे शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री एकनाथ शिंदे गुजरात येथील सुरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांचाही बंदोबस्त असल्याचे पाहायला मिळतेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार घेऊन याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, नक्कीच काही आमदार मुंबईत नाही आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे, रात्री. पण आज सकाळपासून अनेक आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेसुद्धा आहेत. मुंबईच्या बाहेर आहेत आणि त्यांचासुद्धा संपर्क झालेला आहे. ज्या प्रकारचं चित्र बाहेर निर्माण केलं जातंय याक्षणी की भूकंप होईल किंवा अन्य काही होईल. त्याच्यामध्ये मला किंवा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही. नक्कीच काही ठिकाणी संशयास्पद असं वातावरण निर्माण झालेलं आहे काहीबाबतीत तेसुद्धा दूर होईल.

महाराष्ट्रामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकऱ्यांचं सरकार पाडावं अशा प्रकारचं एक हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न राजस्थान पॅटर्न हा महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही आणि या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्राच्या छातीवर घाव घातला येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष जे आहेत मंगलप्रभात लोढा त्यांनी कालच्या विधानपरिषदेच्या निकालानंतर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यांची पावलं कोणत्या दिशेनं पडताहेत ते समजून घ्या. आता मुंबईवर ताबा मिळवू, मुंबईवर विजय मिळवू म्हणजे काय मिळवू? यासाठी तुम्ही फाटाफूट घडवून आणताय काय, मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला आधी कमजोर केलं पाहिजे, शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे. अशाप्रकारचं भाकीत आम्ही यापूर्वीसुद्धा केलेलं.

शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी औलाद निर्माण होणार नाही. हे माननीय उद्धव ठाकरेंनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सांगितलं. तेसुद्धा तुम्ही समजून घ्या. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वतःला विकणारी, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही शिवसेनेत कधी निर्माण होणार नाही. जी निर्माण झाली आणि बाहेर पडली त्यांची अवस्था आपण पाहत असाल. जे आमदार इथे नाहीयेत असं आपण म्हणताय त्यापैकी काही मंत्री आहेत त्यांच्याशी संपर्क झाल्यावरती त्यांचं असं म्हणणं आहे की, आम्हाला काय झालं ते काळात नाही पण आम्हाला इथे आणण्यात आलं. ते आमदार गुजरातमध्ये आहेत, सुरतमध्ये आहेत आणि त्यांची व्यवस्था गुजरात भारतीय पक्षाचे अध्यक्ष आहेत ते करताहेत. म्हणजे तुम्हाला यामागे मी जे काही सांगतोय ते कळलं असेल की, गुजरातलाच का त्यांना नेण्यात आलं सुरतमध्येच का ठेवण्यात आलं. अशाप्रकारे भ्रम आणि फसवणूक करून आमदारांना नेलं जातंय, ज्या क्षणी त्यांचा आमचा संपर्क होईल त्या क्षणी ते परत येतील. बाकी अशा प्रकारे भूकंपाची योजना किंवा भाषा कोणी करत असेल तर त्यांना सगळ्यात आधी शिवसेनेबरोबर लढावं लागेल. आमच्याबरोबर लढावं लागेल आणि मगच त्यांना महाराष्ट्र दुबळा करता येईल. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही.

एकनाथ शिंदे हे कालपर्यंत आमच्याबरोबर होते. शिवसेनेचे उमेदवार विजयी व्हावे दोन्ही त्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. अनेक बाहेरच्या मतदारांशी संपर्क करत होते. एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे मी सांगू शकतो. त्यामुळे त्यांच्याबाबत आज जे काही बोललं जातंय. जोपर्यंत त्यांचं माझं बोलणं होत नाही तोपर्यंत त्यांच्याबाबत मी कोणतेही विधान आणि भूमिका करणार नाही. तसेच मुख्यमंत्री सर्व खात्यांचा आढावा घेत असतात. गृह खात्याचाही घेतात, महसूल खात्याचाही घेतात. तरीही जर त्यातून काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्हाला दूर करता येतील.

अनेक वर्षांपूर्वी सरकार स्थापन करतानासुद्धा भारतीय जनता पक्षाने अशाप्रकारचा प्रायोग केला होता, तो यशस्वी झाला नाही. त्यामुळे ते थांबून हा दुसरा घाव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हासुद्धा घाव छातीवर नसून पाठीवर आहे. आणि आम्ही छातीवर घाव झेलणारे आहोत.

एकनाथ शिंदे यांच्यामार्फत सरकार पडण्याचा प्रयत्न सुरू आहे का? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले, असा त्यांचा डाव सुरू आहे, पण तो यशस्वी होणार नाही. एकनाथ शिंदे हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य शिवसेनेमध्ये गेलेलं आहे. शिवसेनेच्या अनेक संघर्षांमध्ये, आंदोलनांमध्ये ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंवर त्यांची अढळ निष्ठा पहिल्यापासून आहे. त्यामुळे जे चित्र निर्माण केलं जातंय बाहेर मला त्यात फार तथ्य वाटत नाही.

ज्या प्रकारे गुजरातमध्ये त्यांना अडकवून ठेवलेलं आहे, सरकार कोणाचं आहे गुजरातमध्ये? ज्याप्रकारे तिथे राज्य चालवलं जातं तिथे कशाप्रकारे नियंत्रण आहे आणि सात स्तराची सुरक्षा व्यवस्था तिकडे दिलेली आहे. महाराष्ट्राचा छळ करण्याची, महाराष्ट्राला बदनाम करण्याची, महाराष्ट्राला अस्थिर करण्याची योजना दुर्दैवाने गुजरातच्या भूमीवर रचली जातेय. या देशाचं दुर्दैव आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami