भोपाळ – मध्य प्रदेशच्या बैतूलजवळ आज पहाटे २ च्या सुमारास भीषण अपघात झाला. बस आणि एसयुव्ही कारची टक्कर झाली. त्यात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एक जण जबर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातात ठार झालेले महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील कामगार आहेत. त्यात २ लहान मुलांचाही समावेश आहे, असे बैतूलचे पोलिस अधीक्षक सिमाला प्रसाद यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अमरावतीचे कामगार एसयुव्ही कारमधून घरी परतत होते. गुरुवारी रात्री २ च्या सुमारास त्यांची कार बैतूलच्या झल्लर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भैंसदेही रोडवर आली तेव्हा तिची बसशी समोरा समोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात ११ जण जागीच ठार झाले. ५ वर्षांची एक मुलगी आणि एका मुलाचा यात समावेश आहे. मृतांमध्ये ६ पुरुष आणि ३ महिला आहेत. अपघातात एक जण जखमी झाला आहे. जिल्हा मुख्यालयापासून ३६ किलोमीटरवर हा अपघात झाला. तो इतका जबरदस्त होता की कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी तिचा पत्रा गॅस कटरने कापावा लागला. अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. कार चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज मध्य प्रदेशच्या पोलिसांनी व्यक्त केला.