मुंबई – मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या रविवारी देखभाल दुरुस्तीची महत्वाची कामे केली जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे उद्या मुख्य मार्गावरील लोकल विलंबाने धावणार असून हार्बरची सेवा बंद राहणार आहे, असे रेल्वेने पत्रकात म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक आहे. त्यामुळे धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. त्या भायखळा, दादर, माटुंगा, सायन, कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत. हार्बर रेल्वेवर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या काळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, नेरूळ, बेलापूर ही रेल्वे सेवा बंद राहणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक नाही. त्यामुळे ठाणे ते वाशी आणि नेरूळ ही सेवा सुरू राहणार आहे.