भोपाळ – मध्यप्रदेशातील पन्नाच्या विक्रमपूर जंगलात एक भयानक घटना घडली. एका वाघाला थेट फासावर लटकावण्यात आले. शिकार्यांनी हे कृत्य केले असावे,असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेबद्दल कळताच वन विभागाचे पथक दाखल झाले.वाघाचा मृतदेह झाडावर झुलत असल्याचे द़ृश्य पाहून वनाधिकार्यांनाही कळवळून आले. हे कृत्य शिकार्यांनी अवयवांच्या तस्करीसाठी केले असावे,असा वनाधिकार्यांचा प्राथमिक अंदाज आहे.
पन्नाच्या जंगलातून २००९ मध्येच वाघ नामशेष झाले होते. वाघांच्या संवर्धनासाठी ‘टायगर रिलोकेशन’ ही विशेष मोहीम येथे सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचे यश म्हणून आता येथील वाघांची संख्या वाढली असून, ती सुमारे ७५ झाली आहे. ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळख असलेल्या मध्य प्रदेशात आता वाघ सुरक्षित नाहीत, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
शिकार्यांनी आधी वाघाला मारले आणि नंतर दोरखंडाने झाडावर लटकावले असावे, असाही एक तर्क वनाधिकार्यांनी लावला आहे.एखाद्या जंगलात वाघ असा फासावर लटकावलेला असणे, ही देशातील पहिलीच घटना असावी. मृत वाघ नर असून, २ वर्षांचा होता. या घटनेने पन्नातील व्याघ्रसंवर्धन मोहिमेला गालबोट लागले आहे. उत्तरीय तपासणीनंतर वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी तातडीची बैठक बोलावून अधिकार्यांना धारेवर धरले.श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. शिकार्यांच्या कॉलरपर्यंत आमचे हात लवकरच पोहोचतील,असे छतरपूर वन विभागाचे अधिकारी संजीव झा यांनी सांगितले.