नवी दिल्ली- दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना मद्यविक्री धोरण घोटाळा प्रकरणी पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश सीबीआयने शनिवारी देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता सिसोदिया सीबीआय कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांचे समर्थक किंवा आप कडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वी १९ फेब्रुवारीला त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यांनी दिल्लीच्या अर्थसंकल्पाचे कारण देत तारीख वाढवून मागितली होती.
सीबीआय कार्यालयात जाण्याआधी ते आज राजघाट येथे गेले होते. त्यांच्यासोबत आपचे राज्यसभा खासदार संजय सिंगसुद्धा उपस्थित होते.चौकशीला सामोरे जाण्याआधी,मला अटक झाली तरी मी अटकेसाठी तयार आहे, असे ट्वीट त्यांनी केले होते. तसेच,आज मी पुन्हा सीबीआय कार्यालयात जात आहे. सीबीआयच्या तपासकार्यात मी त्यांना मदत करणार असल्याचे म्हटले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचे हेच ट्वीट रिट्वीट करत तुरुंगात जायला लागल्यास ते भूषण असेल असे सांगितले.
नव्या मद्यविक्री धोरणप्रकरणी गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला सीबीआयने सात जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून नव्हते. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणी तपास करत त्यांचे पैशांचे व्यवहार, मद्यव्यापारी आणि आपनेते यांची माहिती गोळा केली. प्राप्त झालेल्या माहितीनंतर आज सीबीआय सिसोदिया यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार आहेत. तर चौकशीनंतर मनीष सिसोदिया यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.