नारायणगाव – नाशिकहून पुण्याला २५ ते ३० प्रवासी घेऊन जाणाऱ्या वर्मा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला नारायणगावच्या पुढे मंचरच्या दिशेला ईस्सार पेट्रोल पंप नजीक आज मंगळवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
नाशिक वरून पुण्याला वर्मा ट्रॅव्हल्स कंपनीची आराम बस ही प्रवासी घेऊन पुण्याच्या दिशेला जात असताना नारायणगावच्या पुढील बाजूस मंचर हद्दीच्या जवळ असणाऱ्या इस्सार पंपाजवळ गाडीचे इंजिन गरम झाल्याने गाडीच्या मागून धुर येऊ लागला.
प्रवाशांनी धूर निघत असताना गाडी चालक पटेल यास याची कल्पना दिली, चालकाने त्वरित गाडी बाजूला घेऊन प्रवाशांना बाहेर काढले थोड्यावेळातच आगीने रुद्र रूप धारण केले. नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास कळवले मात्र ते येईपर्यंत गाडी संपूर्ण जळून खाक झाली होती. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी वाहतुकीत बदल केला.