संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे! भूतानचे अध्यक्ष वांगचुक नामग्येल यांची अपेक्षा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- भूतान भारताचा जवळचा शेजारी असून भारताच्या सामाजिक – आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. विविध आंतरराष्ट्रीय मंचांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भगवान बुद्धांशी संबंधित भारतातील सांस्कृतिक स्थळे भूतानच्या जनतेकरिता आदराची आहेत. भूतान नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश आहे. या पार्श्वभूमीवर भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा भूतानच्या राष्ट्रीय संसदेचे अध्यक्ष वांगचुक नामग्येल यांनी येथे व्यक्त केली.
वांगचुक नामग्येल यांनी भूतानच्या दहा सदस्यांच्या संसदीय शिष्टमंडळासोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

सुरुवातीला संसद अध्यक्षांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्येल वांगचुक यांच्यावतीने राज्यपालांना शुभेच्छा कळवल्या. आपल्या भारत भेटीमध्ये आपण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला व परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतल्याचे नमूद करुन भूतान संसदेने भारतीय संसदेशी सहकार्य करार केल्याचे वांगचुक नामग्येल यांनी सांगितले.

भूतानचे लोक सर्वात आनंदी असल्याचे आपण ऐकून आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या भूतान व भारत एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. भूतानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याचा अभिमान वाटतो असे सांगून भूतान व भारत यांमध्ये व्यापार, वाणिज्य, लॉजिस्टिकस, याशिवाय पर्यटन, शैक्षणिक सहकार्य व जनतेच्या स्तरावर परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली. भूतानमधील पर्यटकांनी भारतातील कुशीनगर, बोधगया, सारनाथ यांसह महाराष्ट्रातील अजंठा वेरुळ लेण्यांना देखील भेट द्यावी, असेही राज्यपालांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या