मनमाड- पावसात भिजलेल्या झेंडूच्या फुलाचे दर आज कोसळले मनमाडच्या घाऊक बाजारात या फुलांचा दर सरासरी १२ रुपये किलो होता. तर हिंगोलीत हा दर ५ रुपयांपर्यंत घसरला. ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलाचा भाव घसरल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
परतीच्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत धुमाकूळ घातला आहे. त्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे. काढणीला आलेले आणि काढलेले पीक पावसात भिजून खराब झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा तडाखा झेंडूच्या फुलांनाही बसला. फुले पावसात भिजल्यामुळे बाजारात त्यांचे दर कोसळले. मनमाडमध्ये झेंडूच्या फुलाला सरासरी १२ रुपये किलोचा दर आज मिळत होता. हिंगोलीत तर अक्षरशः ५ रुपयांपर्यंत दरात घसरण झाली. दिवाळीत झेंडूच्या फुलांना जास्त मागणी असताना त्यांचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.