पुणे-फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या पुस्तकाला दिलेला राज्य पुरस्कार रद्द केल्यानंतर सुरू झालेले राजीनामा सत्र आजही कायम राहिले.. सरकारच्या निर्णयाचा निषेध करत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या भूमिकेला समर्थन देत समितीचे सदस्य डॉ. विवेक घोटाळे यांनीही राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ हे पुस्तक मी वाचले असून त्यात आक्षेपार्ह काही नाही, असे लेखक म्हणून माझे मत आहे. मूळ इंग्रजी पुस्तकात आणि मराठी अनुवादात नक्षलवादाचे उदात्तीकरण आणि हिंसेचा पुरस्कार लेखकाने केलेला नाही. या पुस्तकावर केंद्र किंवा राज्य सरकारने आजवर तरी बंदी घातलेली नसून ते दोन वर्षांपासून बाजारात उपलब्ध आहे. त्याचा मराठी अनुवादही सहा महिन्यांपासून राज्यभर विक्रीसाठी उपलब्ध आहे. , हा पुरस्कार मूळ पुस्तकाला नाही, तर उत्तम अनुवादाला असतो. त्यामुळे पुरस्कार रद्द करण्याची कृती केवळ अनुचितच नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मौलिक संविधानिक मूल्यांशी प्रतारणा करणारी आहे. तिचा मी तीव्र निषेध करत आहे.
माझ्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने पुढील पंचवीस वर्षांसाठीचे मराठी भाषा विषयक धोरण परिश्रमपूर्वक तयार करून सरकारला सादर केले आहे. त्या संदर्भात सरकारला माझे सहकार्य असेल.
देशमुख यांच्या राजीनाम्याला समितीचे सदस्य डॉ. घोटाळे यांनीही समर्थन दिले आहे.अध्यक्षांचा राजीनामा म्हणजे खरे तर सर्व समितीचा राजीनामा असतो,असे डॉ. घोटाळे यांनी म्हटले आहे.