इंदोर- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत इंदोर मध्ये बॉम्ब स्फोट घडवण्यात येईल अशी धमकी देण्यात आली आहे. इंदोर मधील एका मिठाईच्या दुकानदाराला आलेल्या निनावी पत्रात हि धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरु आहे. त्यानंतर ही भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात पोचणार आहे आणि २८ तारखेला या यात्रेचा मध्य प्रदेशातील इंदोर मध्ये मुक्काम असेल . इंदोरच्या खालसा स्टेडियम मध्ये या यात्रेचा रात्री मुक्काम असेल. याच दरम्यान त्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून राहुल गांधींना ठार मारले जाईल अशा आशयाचे एक पत्र अज्ञात व्यक्तीने एका दुकानदाराच्या पत्त्यावर पाठवले आहे. इंदोरचे पोलीस आयुक्त हरिनारायण मिश्रा यांनी हि माहिती दिली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०७ अन्वये अज्ञात व्यक्ती विरुद्ध एफआयआर दाखल केला असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.असेही मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन भारत जोडो यात्रा जेंव्हा मध्य प्रदेशात पोहचेल तेंव्हा यात्रेची आणि राहुल गांधींची सुरक्षा वाढवावी अशी मागणी मध्य प्रदेश काँग्रेसचे सचिव नीलाभ शुक्ला यांनी केली आहे.तर या धमकीच्या मागे ८ नोहेंबरला गुरु नानक जयंतीच्या दिवशी कमलनाथ यांच्या सत्कारावरून कीर्तनकार मनप्रीत सिंह कानपुरी यांनी जो इशारा दिला होता तेच कारण असावे. कारण आजही मध्य प्रदेशातील शीख समुदायात दिल्लीतील शीख हत्याकांडाबाबत काँग्रेसवर राग आहे .त्यातूनच अशी धमकी देण्यात आली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.