दुबई – जगभरातील श्रीमंत मालमत्ता खरेदी करण्यासाठी दुबईला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.यामध्ये भारतीयही मागे नाहीत.श्रीमंत भारतीय तर दुबईत आपले एक तरी घर असावे असे स्वप्न बाळगून असतात. हे आपले स्वप्न अनेकांनी प्रत्यक्षात उतरवले आहे.मागील २०२२ या एकाच वर्षात तब्बल ३५,५०० कोटी रुपयांची घर खरेदी करण्याचा मान भारतीयांनी मिळविला आहे. त्यामुळे दुबई हे भारतीय नागरिकांचे मोठे आकर्षण बनले असल्याचा हा पुरावाच म्हणावा लागेल.
दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्याची भारतीयांची आवड २००४ नंतर झपाट्याने वाढल्याचे प्रकर्षाने जाणवते. भारतातील बडे उद्योगपती व्यावसायिक आणि सिने कलावंत यांचा येथील घर खरेदीत पुढाकार दिसून येतो.दुबईतील मोठमोठे मॉल, बुर्ज खलिफा सारख्या गगनचुंबी इमारती हे पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे.गेल्यावर्षीच्या दुबईतील बांधकाम क्षेत्रातील माहितीनुसार,भारतीयांनी १६ अब्ज दीरहँम भारतीय चलनात ३५ ५०० कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. तर २०२१ मध्ये ९ अब्ज दीरहँमची घर खरेदी केली आहे. या घर खरेदी करणाऱ्यांमध्ये भारतातील दिल्ली,अहमदाबाद,सूरत आणि पंजाबमधील श्रीमंताचा समावेश आहे. इथले ४० टक्के भारतीय आपल्या स्वताच्या घरात राहतात.कंपन्यांतील मोठ्या हुद्द्यावरील लोक यात जास्त आहेत.कारण जगातील कुठेही दुबईतून संपर्क साधणे सोपे झाले आहे. इथल्या पायाभूत सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत. प्रामुख्याने त्यात शाळांचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच भारतीय दुबईला जास्त पसंती देतात. इथला मालमत्ता करही फारच कमी आहे.इथे भाड्याने घर दिल्यास दरमहा ३ ते ३.५० लाख रुपये नक्कीच मिळू शकतात.