नवी दिल्ली – भारतीय संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
यशपाल शर्मा हे १९८३च्या विश्वविजेत्या संघाचे भाग होते. त्यांनी या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ८९ धावांची खेळी करत भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले होते. ते जेव्हा मैदानावर उतरले तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ७६ अशी होती. त्यावेळी त्यांनी १२० चेंडूत ८९ धावा केल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान ४० धावा आणि इंग्लंडविरुद्ध अवघड परिस्थितीत ६१ धावा त्यांनी केल्या. या स्पर्धेत शर्मा यांनी ३४.२८च्या सरासरीने एकूण २४० धावा केल्या.
शर्मा यांनी १९७९ साली लॉर्ड्स मैदानातून इंग्लंडविरुद्ध आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि १९८३ साली ते कारकिर्दीतील अखेरची कसोटी खेळले. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून ३७ कसोटी सामन्यांत ३३.४५च्या सरासरीने १ हजार ६०६ धावा केल्या. १४० ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. तर एकदिवसीय ४२ सामन्यांत त्यांनी देशाचे प्रतिनिधित्त्व केले. यात त्यांनी २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या. आज त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.