मीरपूर – शेरे बांगला स्टेडियममध्ये खेळला जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामनाच्या तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात विजयासाठी 145 धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने चार विकेट गमावून 45 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 100 धावांची गरज आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर बांगलादेशचा संघ 80 धावांनी पिछाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशीच्या अखेरच्या सत्रात भारताने बांगलादेशच्या संघाला 231 धावांवर रोखले. लिटन दास आणि झाकीर हसन यांनी शानदार अर्धशतके झळकावली. दुसऱ्या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत भारताला मजबूत स्थितीत नेले. हा सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 145 धावांची लक्ष्य मिळाले आहे. बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची दमछाक झाली. भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल (2), चेतेश्वर पुजारा (6), शुबमन गिल (7) आणि विराट कोहली (1) हे झटपट बाद झाल्याने भारतीय संघ अत्यंत नाजूक स्थितीत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 4 बाद 45 धावांपर्यंत मजल मारली आहे. बांगलादेशकडून मेहंदी हसन मिराजनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, शाकीब अल हसनला एक विकेट मिळाली.