बीड – परळी तालुक्यातील पांगरी गावातील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जबरदस्त धक्का बसला आहे.पंकजा मुंडे यांचे भाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी या सोसायटीमध्ये तब्बल १२ वर्षानंतर सत्तांतर घडवुन आणले आहे.धनंजय मुंडे गटाने ही सोसायटी सर्वच्या सर्व जागा जिंकून काबीज केली आहे.या निवडणुकीचे किंगमेकर म्हणून धनंजय मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी वाल्मिकी कराड यांच्याकडे पाहिले जात आहे.
तब्बल १२ वर्षानंतर पांगरी येथील सोसायटीवर धनंजय मुंडे यांचे एकहाती वर्चस्व पहावयास मिळाले आहे. पांगरी येथेच गोपीनाथ गड आहे.त्यामुळे मुंडे भावंडांची ही लढाई वर्चस्वाची मानली गेली होती.आता याच गावातून धनंजय मुंडे यांच्या गटाने दणदणीत विजय मिळविल्याने पंकजा मुंडे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पांगरी सोसायटीच्या निवडणूक विजयानंतर धनंजय मुंडेंच्या गटाने मोठा जल्लोष केला आहे.लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पांगरी सोसायटीवर वर्चस्व होते.मात्र त्यांच्या निधनानंतर पांगरीच्या ग्रामस्थांनी पंकजा मुंडे यांना मोठी साथ देत सेवा सहकारी सोसायटी ताब्यात दिली.यंदा मात्र या निवडणुकीत मुंडे बहीण भावात चुरशीची लढाई झाली. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने धनंजय मुंडे विजयी झाले.त्यानंतर मात्र परळी मतदार संघातील अनेक लहान मोठ्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी जातीने लक्ष देत विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरूवात केली आणि त्याचेच फलित म्हणून पांगरी सेवा सहकारी सोसायटी ताब्यात घेण्यात त्यांना नेत्रदीपक यश मिळाले आहे.पांगरी सोसायटीच्या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे वाल्मिकी कराड हे किंगमेकर ठरले आहेत.ते परळी नगरपरिषदेचे गट नेते आहेत.ते धनंजय मुंडेंचे अत्यंत जवळचे मानले जातात.निवडणूक असो वा कुठला कार्यक्रम त्याची संपूर्ण जबाबदारी वाल्मिक कराड यांच्या खांद्यावर असते.पांगरी हे गाव वाल्मिक कराड यांचे आहे. आणि याच परिसरातून विधानसभा निवडणूक विजयाचे गणित जुळविले जाते.वाल्मिक कराड यांची या भागात मजबूत पकड आहे. सर्वसामान्यांना तात्काळ मदत करणारे अण्णा म्हणून त्यांची खरी ओळख आहे.आमदार धनंजय मुंडेंच्या माघारी वाल्मिक कराड यांनीच या निवडणुकीचे सूत्र हलविले. त्यामुळे या निवडणुकीत वाल्मिकी कराड यांना किंगमेकर मानले जाते.