लंडन – ब्रिटनमध्ये सत्ता पालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवघ्या महिन्याभरापूर्वी अस्तित्वात आलेले ब्रिटनचे लिझ ट्रस सरकार संकटात सापडले आहे.हुजूर पक्षातून ट्रस यांना हटवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्याकडे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ‘छोटय़ा अर्थसंकल्पा’मधील कररचनेवर माघार घ्यावी लागत असल्याने ट्रस यांनी अर्थमंत्री क्वासी क्वारतेंग यांची हकालपट्टी केली आहे.
‘छोटय़ा अर्थसंकल्पा’तील कररचनेमुळे ब्रिटनची अर्थव्यवस्था प्रचंड धोक्यात आली आहे.यातील आणखी काही करसवलती मागे घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. हुजूर पक्षासाठी ही धक्कादायक घटना मानली जात आहे.‘यू-जीओव्ही’ या संकेतस्थळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार हुजूर पक्षाच्या ६२ टक्के सदस्यांनी चुकीचा नेता निवडल्याची भावना व्यक्त केली आहे. ट्रस आणि सुनक या दोघांपैकी केवळ १५ टक्के सदस्यांना ट्रस यांची निवड योग्य वाटते आहे. ही आकडेवारी समोर आल्यामुळे पक्षात खळबळ माजली असून ट्रस यांना हटवण्याबाबत खलबते सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच अर्थमंत्री क्वारतेंग यांची ट्रस यांनीच हकालपट्टी केली. सुरूवातीला त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त होते, मात्र क्वारतेंग यांनी स्वत:च ट्विटरवर आपले राजीनामापत्र टाकले. त्यानुसार ट्रस यांनी क्वारतेंग यांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले आहे.अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये जगभरातील अर्थमंत्र्यांची बैठक अर्धवट सोडून क्वारतेंग यांनी लंडनला धाव घेतली. १० डाऊिनग स्ट्रीट येथे जाऊन ट्रस यांच्या भेटीत राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. क्वारतेंग यांच्या जागी ट्रस यांनी जेरेमी हंट यांची अर्थमंत्रीपदी नियुक्ती जाहीर केली.बोरीस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर हंट स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते.मात्र पुरेशी मते जमा होत नसल्यामुळे त्यांनी माघार घेऊन सुनक यांना पाठिंबा जाहीर केला होता. आता अर्थमंत्रीपदी सुनक समर्थकाची नियुक्ती करून हुजूर पक्षात वाढलेली दरी घटवण्याचा प्रयत्न ट्रस यांनी केल्याचे मानले जात आहे. हुजूर पक्षाच्या घटनेनुसार एकदा नेता निवडल्यावर १२ महिने त्याला आव्हान देता येत नाही,मात्र ‘१९२२ बॅकबेंचर्स कमिटी’ ही पार्लमेंट सदस्यांची प्राधिकृत समितीमध्ये मतदान घेऊन नेत्याला हटवले जाऊ शकते.आगामी निवडणुकीत ट्रस यांच्या धोरणांमुळे पक्षाला फटका बसेल,याची खात्री झाली तर ही समिती त्यांना हटवू शकते.