साओ पाउलो: ब्राझीलला ३ वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू पेले यांचे ८२ व्या वर्षी गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते. फिफा वर्ल्ड कप दरम्यान त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मागच्या आठवड्यापासून त्यांची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडली. त्यांच्या निधनानंतर फुटबॉल विश्वात शोककळा पसरली आहे. पेले यांची मुलगी नेसिमेंटोने इन्स्टाग्रामवर तिच्या वडिलांच्या निधनाची माहिती देत,‘आमचे अस्तित्वच तुमच्यामुळे आहे. तुमच्यावर कायम प्रेम असेल अशा आशयाचा एक भावनिक संदेशही आपल्या वडिलांसाठी लिहिला आहे.
पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला होता. पेले ९ वर्षांचे असताना त्यांनी वडिलांना रेडिओवर काॅमेंट्री ऐकताना बघितले. ब्राझील पराभूत झाल्याने वडील रडायला लागले. त्यांचे अश्रू पुसत पेले म्हणाले, रडू नका, मीही वर्ल्डकप जिंकेन. पेले यांनी आपल्या वडिलांकडून फुटबॉलचे धडे गिरवले होते. त्यांच्या वडिलांच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे ते फ़ुटबॉल खेळू शकले नव्हते. मात्र त्यांनी आपले स्वप्न मुलगा पेले यांना महान खेळाडू बनवून पूर्ण केले.
पेले यांनी फुटबॉल विश्वात दोन दशके अधिराज्य गाजवलं. पेलेंनी ४ वर्ल्डकप खेळले, पैकी ३ जिंकले. १९७१ मध्ये ब्राझील राष्ट्रीय संघातून निवृत्ती पत्करणाऱ्या पेलेंची कारकीर्द २१ वर्षांची होती. ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाशिवाय ब्राझीलमधील क्लब सांतोसकडून ते खेळायचे. १९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिकदेखील केली होती. पेलेंनी १७ व्या वर्षीच फिफा वर्ल्डकप जिंकला होता. हा सर्वात कमी वयात वर्ल्डकप जिंकण्याचा एक विक्रम आहे. आपल्या फुटबॉल कारकिर्दीत १३६६ सामन्यांमध्ये त्यांनी १२८१ गोल केले. त्यांची गोल सरासरी ०. ९४ इतकी होती. तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे ते एकमेव फुटबॉलपटू होते. पेले यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. पेलेंना श्रद्धांजली वाहताना ब्राझीलचा नेमार म्हणाला, ‘पेलेंच्या आधी १० हा फक्त एक क्रमांक होता. त्यांनी त्याला कलेत बदलले.