मुंबई : बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरील खर्च तसेच बेस्टची इंधन बचतीसाठी मुंबईतील बेस्टच्या सर्व आगारांमधील अधिकारी वर्गासाठी बेस्ट उपक्रमाने इलेक्ट्रिक व्हेईकल वापराची सुरूवात केली आहे. एकुण ३५० इलेक्ट्रिक व्हेईकल बेस्ट उपक्रमाने घेतलेल्या आहेत. इलेक्ट्रा या कंपनीकडून या गाड्या बेस्टला पुरविण्यात आलेल्या आहेत.
विशेष बेस्ट उपक्रमाने इंधनाची बचत करण्यासाठी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करायला सुरूवात केली आहे. बेस्टच्या सर्व आगारांमध्ये प्रत्येकी दहा ते पंधरा इतक्या प्रमाणात या इलेक्ट्रिक कार पुरविण्यात आलेल्या आहेत. बेस्टच्या दक्षता आणि सुरक्षा विभागाला या कार देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या विविध विभागात या कार पोहचायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाला देण्यात येणाऱ्या कारमुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांवरील खर्चातही बचत होणार आहे. बेस्टच्या दैनंदिन कामात बेस्टकडून वाहनांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकलच्या वापरामुळे बेस्टची इंधन बचत होणार आहे हे नक्की.
बेस्ट उपक्रमाने आगामी वर्षभरात इलेक्ट्रिक टॅक्सी आणि ई स्कुटर सेवेत आणण्यासाठीचेही नियोजन केले आहे. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात एकुण ५०० इलेक्ट्रिक टॅक्सी येणार आहेत. बस सेवेला जोड सेवा अशा स्वरूपाची सेवा मिळणार आहे. त्यासोबतच ५ हजार इलेक्ट्रिक स्कुटरही रिंगरूट सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा उपयोग हा मुंबईकरांसाठी प्रवासासाठी होणार आहे.