मुंबई – बेस्ट बसमध्ये प्रवासी विसरून गेलेल्या स्मार्ट फोन,लॅपटॉप, स्मार्ट वॉच आणि अन्य ब्रँडेड वस्तूंचा लवकरच बंपर लिलाव करण्यात येणार आहे.मात्र, या लिलावातील वस्तू सामान्य नागरिकांना घेता येणार नाही.या वस्तू घाऊक पद्धतीने केवळ बड्या व्यापाऱ्यांनाच घेता येणार आहेत.
अनेक बेस्ट प्रवासी बसमधून प्रवास करत असताना घाईगडबडीत आपला स्टॉप आल्यानंतर आपल्या खिशातील पेण,पिशवीत ठेवलेले कपडे,पाण्याच्या किंमती बाटल्या आदी वस्तू विसरतात.या विसरल्या गेलेल्या वस्तू आता या लिलावात स्वस्तात मिळणार आहे.वास्तविकता या विसरलेल्या वस्तू काहीजण संबंधीत बस आगराशी संपर्क साधून आणि ओळख पटवून घेऊन जातात. त्यासाठी काहीवेळा त्यांना ठराविक दर आकारला जातो.पण असेही अनेक प्रवासी असतात की जे बेस्ट बसमध्ये विसरलेल्या आपल्या वस्तू घेण्यासाठी बेस्टच्या संबंधीत आगाराशी संपर्क साधत नाहीत किंवा प्रत्यक्ष तिथे जात नाहीत.मग अशा साठलेल्या वस्तूंचा बेस्ट प्रशासन लिलाव करत असते.सध्या बेस्ट बसमध्ये विसरून गेलेल्या आणि बेस्टच्या ताब्यात असलेल्या वस्तूंमध्ये मोबाईल २०१, स्मार्ट वॉच १०४१,लॅपटॉप ७९,गॉगल ३ आणि कपडे,चप्पल आणि पाण्याच्या बाटल्यांचा समावेश आहे.