मुंबई – मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाला गती देण्याचा पुढील टप्पा सुरू झाला आहे. १३५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामासाठी नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशन लिमिटेडने निविदा मागवल्या आहेत. व्हायाडक्ट, माउंट बोगदे आणि ३ स्थानकांचा त्यात समावेश आहे. याचबरोबरच ५०८ किमी कॉरिडोरसाठीही निविदा मागवल्या आहेत. १४ मार्च २०२३ ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.
महाराष्ट्रातील कॉरिडोरची एकूण लांबी १५६ किलोमीटर आहे. गुजरातमध्ये ३४८ किलोमीटर आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात ४ किलोमीटर अशा ५०८ किलोमीटर कॉरिडोरसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी काम सुरू आहे. मुंबईबाहेर १३५ किमीचा मार्ग महाराष्ट्र-गुजरात सीमेवर शिळफाटा-झरोली दरम्यान येतो. या भागात ठाणे, विरार आणि बोईसर ही ३ स्थानके बांधली जाणार आहेत. १३५ किलोमीटर कॉरिडोरच्या निविदांमध्ये ३६ पुलांच्या बांधकामांचा समावेश आहे. त्यातील ११ पूल नद्यांवर आहेत. डोंगरात ६ बोगदे आहेत. त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १४ मार्च २०२३ पर्यंत निविदा भरण्याची मुदत आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या उघडण्यात येतील. बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकाच्या बांधकामासाठी २२ जुलै २०२२ रोजी निविदा मागवल्या होत्या. त्याच्या तांत्रिक निविदा ४ नोव्हेंबरला उघडल्या. त्यात अंतिम निविदा ठरवल्या जात आहेत. लार्सन अँड टुब्रो, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, एपकॉन्स इंन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि एमइआयएल-एचसीसी जॉइंट व्हेंचर या ४ बड्या कंपन्यांच्या बीकेसीसाठी निविदा भरल्या आहेत. बीकेसी स्टेशन ते शिळफाटा दरम्यान ७ किलोमीटर बोगद्यासाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी निविदा मागवल्या होत्या. त्या २० जानेवारी २०२३ ला उघडल्या जाणार आहेत. २१ किलोमीटर लांबीचा बोगदा ७ किमी ठाणे खाडीच्या खाली असेल. ५०८ किमी बुलेट ट्रेन कॉरिडोरपैकी ९२ टक्के एलिव्हेटेड, ६ टक्के बोगद्यातून व उर्वरित जमिनीवरून असेल.