मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी रोजी जयंती असून या जयंतीदिनाचे औचित्य साधत मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात दुपारी ४ वाजता ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकाचा पहिला प्रयोग सादर होणार आहे.दोन तासांच्या या नाटकात दोनच पात्र आहेत. एक बाळासाहेब आणि दुसरे राज ठाकरे.बाळासाहेबा ठाकरेंच्या विचारांचे वारसदार राज ठाकरे आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात येणार आहे. कलाकार सचिन नवरे हे बाळासाहेबांची आणि प्रफुल आचरेकर हे राज ठाकरेंची भूमिका वठविणार आहेत. नाटक द्विपात्री असल्यामुळे या दोहोंच्या अभिनयासोबतच स्क्रिन प्रेझेंटेशनद्वारे काही जुन्या आठवणी देखील जागविल्या जाणार आहेत, अशी माहिती दिग्दर्शक अनिकेत बंदरकर यांनी दिली. या नाटकाला मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि आमदार राजू पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांच्या विशेष सहकार्याने हे नाटक सादर केले जाणार आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्खक अनिकेत प्रकाश बंदरकर यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येकालाच राज ठाकरे हेच स्व. बाळासाहेबांचे खरे वारसदार वाटतात. ही जनमाणसांची भूमिका आम्ही नाटकाद्वारे सादर करत आहोत. बाळासाहेब आणि राज ठाकरे यांच्यात अनेक समान धागे आहेत. व्यंग चित्रकला, हिंदुत्त्वाची भूमिका, वक्तृत्व, संघटन कौशल्य असे अनेक गुण राज ठाकरे यांच्यात दिसतात. या गुणांची झलक ‘बाळासाहेबांचा राज’ या नाटकातून दाखविली जाणार आहे.