नाशिक – शेतीच्या प्रत्येक हंगामात संकटांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे. कांदा, मेथी, कोबी, वांगी या पिकांसोबत भाजीपाला पिकासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही शेतीमालातून निघणे कठीण झाले आहे.जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील सावकी येथील शेतकरी धनंजय अशोक बोरसे यांनीही आपल्या २० गुंठे क्षेत्रावरील वांगी पिकावर बाजारभाव मिळत नसल्याने हताश होऊन रोटर फिरवला आहे.
बोरसे यांनी अर्धा एकर क्षेत्रावर तीन महिन्यापूर्वी वांगीची लागवड केली होती. त्यासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च आला होता. त्यानंतर महिन्याभरापासून उत्पादन सुरु झाले होते. मात्र या शेतकऱ्याच्या हातात काहीही येत नसल्याने शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून वांगी पिकावर रोटर फिरवला.वांगी पिकाला अवघा एक रुपया बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे हे पीक विकून तरी काय उपयोग?असे म्हणत बोरसे यांनी या उभ्या पिकावर रोटर फिरवला आहे.गेल्या काही दिवसांपासून कांदा,वांगे, आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळेच शेतकरी शेतात आलेल्या पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात,कधी उभ्या पिकात जनावरे सोडतात.