बदलापूर – बदलापूर एमआयडीसीतील गगणगिरी केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज रविवारी दुपारी घडली. या आगीत 2 कामगार जखमी झाले आहेत. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.
बदलापूर एमआयडीसी परिसरात अग्निशामक केंद्राच्या समोरच गगनगिरी फार्मा केमिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये विविध प्रकारचे फार्मा इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल तयार करण्याचे काम केले जाते. आज दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी अचानक या कंपनीमध्ये आग लागली. बदलापूर पालिकेची अग्निशमन यंत्रणासमोरच असल्याने बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग तत्काळ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केले. मात्र कंपनीत अत्यंत ज्वलनशील रसायन असल्यामुळे ही आग क्षणार्धात वाढली. संपूर्ण कंपनी या आगीच्या विळख्यात सापडली. तेथील रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. आजूबाजूच्या कंपन्यांही बंद करण्यात आल्या. बदलापूर, अंबरनाथ एमआयडीसी, अंबरनाथ पालिका, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली आणि तळोजा एमआयडीसीमधील अग्निशामक दलाच्या गाड्यासह जवानांना पाचारण केले. ज्वलनशील केमिकल मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाणी आणि फोमचा वापर केला आहे. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याची काम सुरु होते. या आगीच्या घटनेत दोन कामगार जखमी झाले.