मनीला – फिलिपाईन्समध्ये ‘नाल्गा’ या चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पाऊस, महापूर आणि भूस्खलनामुळे ७२ जणांचा बळी गेला आहे. फिलिपाईन्सच्या दक्षिण भागास वादळाचा मोठा फटका बसला.अद्याप सुमारे ६० लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भूस्खलनामुळे खडक, झाडे व मातीच्या ढिगार्यात ते गाडले गेल्याची भीती अधिकार्यांनी व्यक्त केली.
गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेपर्यंत मागुइंदानाओ प्रांतातील तीन शहरांमध्ये पुरात किमान ४२ जण बुडाले. यापैकी काही जण चिखल-दलदलीत सापडले, असे मंत्री नागुइब सिनारिम्बो यांनी सांगितले. हे वादळ शनिवारी पहाटे पूर्व भागात कॅमेरिन्स सूर प्रांतात पोहोचले.मागुइंदानाओ प्रांतात पूर आणि भूस्खलनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे नद्यांमध्ये खूप पाणी आले असून, सोबत मोठ्या प्रमाणावर कचरा आला आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी लोकांना मदत पाठविण्यासाठी आम्ही यशस्वी झाली असून, अशी काही क्षेत्रात अद्याप मदत पोहोचू शकलो नाही,अशी माहिती मंत्री नागुइब सिनारिंबो यांनी दिली.
हवामान खात्याच्या माहितीनुसार,या वादळामुळे परिसरात जोरदार पाऊस होत आहे. हे वादळ २८ ऑक्टोबर रोजी दुपारी उत्तर समर प्रांतातील कॅटामरन या पूर्वेकडील शहरापासून १८० किमी अंतरावर होते.हे वादळ ८५ किमी प्रतितास वेगाने वारे घेऊन वायव्येकडे वेगाने सरकत आहे,अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ सॅम डुरान यांनी दिली आहे.
फिलीपिन्स दरवर्षी २० तीव्र वादळांचा सामना करते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राय चक्रीवादळ फिलिपाइन्सला धडकले होते.त्यात २०८ लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ४ लाख लोक बाधित झाले होते.तसेच, यावर्षी एप्रिलमध्ये वादळाने घातलेल्या धुमाकुळात ४२ लोकांचा मृत्यू झाला असून १७ हजार लोक बेघर झाले होते.