मुंबई- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने प्रेयसीची हत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बेडच्याआत टाकून आरोपी फरार झाला.मात्र, तुळिंज पोलिसांनी अवघ्या २४ तासात आरपीएफच्या मदतीने गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवरील नागदा रेल्वे स्थानकात आरोपीला पकडले. हार्दिक शहा असे आरोपीचे नाव असून, मेघा तोरबी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
हार्दिक सुशिक्षित बेकार असून, मेघा परिचारिका होती. आरोपी कामधंदा करीत नसल्याने दोघात वादविवाद होते. याच वादातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. ही हत्या दोन ते तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. नालासोपारा पूर्व तुळिंज रोडवरील सीता सदन इमारतीत सोमवारी रात्री सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. आरोपीने राहत्या घरात गळा दाबून हत्या केली व मृतदेह घरातील बेडमध्ये टाकला. त्यानंतर घरातील काही सामान विकून,आलेले पैसे घेऊन आरोपी फरार झाला. मात्र, आरोपीचा शोध घेतला असता तो राजस्थानला रेल्वेने जात असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे त्याला ट्रेस करून, रेल्वे पोलिसांच्या मदतीने नागदा रेल्वे स्थानकात ताब्यात पकडले.