मुंबई – आपल्या मधुर आवाजाने अनेक गाणी गाणार्या भारतातील प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांनी सलग तिसर्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले स्थान कायम राखले आहे. अमेरिकन पॉपस्टार टेलर स्विफ्ट, ड्रेक आणि बेयॉन्से यासारख्या जगातील सर्वांत मोठ्या गायकांना मागे टाकत अलका यांनी हे अप्रतिम यश संपादन करून यूट्यूबवर २०२२ मधील सर्वाधिक गाणी ऐकलेल्या गायिका बनल्या आहेत.
अलका यांच्या आवाजाचे जगभरात चाहते आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार, अलका याज्ञिक यांच्या गाण्यांमध्ये १५.३ अब्ज स्ट्रीम रेकॉर्ड झाले आहेत, म्हणजे दररोज सरासरी ४२ दशलक्ष स्ट्रीम. मागील दोन वर्षांतही त्या सर्वाधिक ऐकल्या गेलेल्या गायिका ठरल्या होत्या.तेव्हाही त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदविण्यात आले होते. २०२१ मध्ये त्यांचे १७ अब्ज स्ट्रीम्स आणि २०२२ मध्ये १६.६ अब्ज स्ट्रीम्स होते. या यादीत असेही दिसून आले की,अलका याज्ञिक यांचे अत्यंत प्रसिद्ध गाणे ‘एक दिन आप यूं हम को मिल जाएंगे’ हे २०२१ आणि २०२० मध्ये यूट्यूबवर १६.६ वेळा स्ट्रीम केले गेले. या यादीत अलकानंतर बॅड बन्नी १४.७ अब्ज स्ट्रीम्ससह दुसर्या क्रमांकावर आहे. याच यादीत तीन भारतीय गायक आहेत. त्यापैकी उदित नारायण (१०.८ अब्ज), अरिजित सिंग (१०.७ अब्ज) आणि कुमार सानू (९.०९ अब्ज) यांचा समावेश आहे.