*दहावी- बारावी बोर्डाच्या सूचना
औरंगाबाद- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणार्या १० वी आणि १२ वी परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २ मार्च तर कालावधीत, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान होणार आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील सूचना जारी केल्या आहेत.त्यानुसार दहावी-बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केल्यास त्या परीक्षार्थीला पाच वर्षे परीक्षा देता येणार नाही.
दहावी बारावीच्या पेपर फुटीला आळा घालण्यासाठी राज्य मंडळांने काही सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना विद्यार्थ्यांना देखील शाळेत वाचून दाखवण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला देण्यात आले आहेत. यामध्ये दहावी-बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर व्हायरल केल्यास परीक्षार्थीला पाच वर्ष परीक्षा देता येणार नाही असा निर्णय बोर्डाने घेतला आहे.त्याचप्रमाणे असा प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधातही आता फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. तसेच उत्तर पत्रिकेत मोबाईल क्रमांक टाकून संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे.
त्याचप्रमाणे महामंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्यात आलेले आलेख, नकाशे,लॉंग टेबल अनधिकृतपणे मिळवल्यास आणि त्याचा गैरवापर केल्यास पुढील एका परीक्षेसाठी प्रतिबंध केला जाईल.तसेच मंडळांने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा कक्षात जवळ बाळगता येणार नाही. त्याचा वापर करताना कोणी आढळले तर त्या परीक्षार्थीवर परीक्षेवर प्रतिबंध घातला जाईल. उत्तर पत्रिकेत,पुरवणीत प्रक्षोभक भाषेचा वापर, शिवीगाळ किंवा धमक्या देणे,बैठक क्रमांक,फोन नंबर मोबाईल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे हा गैरप्रकार समजण्यात येईल. यासोबत अशा परीक्षार्थींवर कठोर कारवाई करण्यात येईल. विषयाशी संबंधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे, उदाहरणार्थ गाणे, सिनेमाचा डायलॉग,कथा लिहिणे याही परीक्षार्थीला परीक्षेतून दूर करण्यात येईल.तर परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थीसोबत उत्तरांच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधने,एकमेकांचे पाहून लिहिणे,अन्य परीक्षार्थींना तोंडी उत्तरे सांगताना सापडल्यास परीक्षेतून पाच वर्षासाठी डीबार केले जाईल.