मुंबई – मुंबईच्या वातावरणात पसरलेल्या धुलीकणांनी मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले असून काल गुरुवारी तर मुंबईची हवा दिल्लीच्या तुलनेत कित्येक पटींनी प्रदूषित नोंदविण्यात आली आहे.मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक ३१५, तर दिल्लीचा २६२ एवढा नोंदविण्यात आला आहे. परिणामी आता मुंबईने प्रदूषणाबाबत दिल्लीलाही मागे टाकले असून उत्तरोत्तर वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास गुदमरू लागला आहे.
मुंबईची भौगोलिक रचना यास जबाबदार आहे. मुंबई एक बेट आहे. प्रथमत: मुंबई समुद्र सपाटीला असून, शहरातील हवेच्या गुणवत्तेला इतर हवामान घटकांबरोबरच परिणाम करणारे अत्युच्च हवेचा दाब, खाऱ्या वाऱ्यांचा हंगामानुसार होणारा वहन वेग बदल या दोन बाबी मुख्यत्वे जबाबदार आहेत. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की,पूर्व गुजरात व पश्चिम मध्य प्रदेशमार्गे काश्मीर,पंजाब,
राजस्थानाची थंडी कमी वेळात मुंबईत दाखल होते. ही थंडी समुद्रसपाटीमुळे हवेच्या उभ्या खांबाला मिळालेली अधिक उंची व त्यामुळे उच्च हवेचा दाब तयार होतो.थंडीमुळे हवेला अधिक घनता मिळते. हवा जमिनीलगतच खूप उंचीपर्यंत खिळून राहते. थोडक्यात त्याचे एक घट्ट गाठोडे तयार होते.त्यामुळे प्रदूषित धुलीकण व सकाळचे धुके दोघांच्या मिश्रणातून स्मॉग कण संथ वा-यात अडकून पडतात आणि नाकाद्वारे शरीरात जाऊन श्वसनविकार जडवतात.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता लक्षणीय प्रमाणात घसरली आहे.धुरक्याचे साम्राज्य मुंबई आणि परिसरावर पसरले आहे.त्यामुळे अनेकांना श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते प्रदूषित हवेचा परिणाम केवळ श्वसनावरच नव्हे तर मेंदूच्या पेशींवरही होतो. त्यामुळे स्मरणशक्ती आणि विश्लेषणात्मक विचार प्रक्रिया बाधित होते.