सातारा- जिल्ह्यातील कास पठारावर वन्य प्राण्यांची ये-जा कमी झाल्याने पठारावर येणा-या फुलांचा बहर कमी हाेऊ लागला आहे असे मत सातत्याने पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात हाेते. यंदाच्या हंगामात देखील कास पठारावर फुले कमी प्रमाणात उमलली अशी चर्चा हाेती. पर्यावरणप्रेमींच्या तसेच तज्ञांची मते जाणून घेतल्यानंतर आज जिल्हा प्रशासनाने कास पठाराचे कुंपण काढले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले कास पठार येथे कुंपण घातल्यापासून या पठारावरील फुलांचे उमलण्याचे प्रमाण कमी झाले तसेच येथील जैवविविधता धोक्यात येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. त्यामुळे कास पठार येथील कुंपण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
कास समिती आणि फाॅरेस्ट यांच्या संयुक्तपणे येथे कुंपण घालण्यात आले हाेते. या कुंपणामुळे प्राण्यांना कास पठारावर जाता येत नव्हते. त्यामुळे त्यांचे मुत्र आदी गाेष्टी पठारावर पडत नव्हत्या.त्यामुळे फुले येण्याचे कमी झाल्याचे बाेलले जात हाेते. आता हे कुंपण काढून टाकण्यात आले आहे. दरम्यान हंगाम काळात येथे कुंपण लावण्यात येईल. ते तात्पुरते असेल असेही जयवंशी यांनी नमूद केले आहे.दरम्यान, प्रतापगडावरील अफजल खान कबर हटविल्यानंतर जिल्हा प्रशासनाने कास पठारचे कुंपण काढल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला. आता त्यांच्या प्राण्यांना चरण्यासाठी पठार खूले झाले आहे.