पैठण- पैठण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दोन दिवसापासून अपघाताच्या घटना घडत आहेत. अशातच आज पैठण-पाचोड रोडवर एका अज्ञात ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
पैठण-पाचोड रोडवर आज सकाळी हा अपघात झाला. सावता सोनवणे (२३) व अंगत बारे (२२) हे दोघे नांदर येथून दुचाकीवर कंपनीत कामासाठी जात होते. दरम्यान पाचोडकडे जाणाऱ्या एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच स्वराज्य संघटनेचे मराठवाडा पदाधिकारी अनिल राऊत यांनी पोलीस व नागरिकांच्या मदतीने जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले. मात्र, सावता याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.