संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

पॅरोलवर बाहेर आलेल्या राम रहीमच्या सत्संगात भाजपच्या नेत्यांचा सहभाग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

चंडीगड: बलात्काराचे आरोपी गुरमीत राम रहीम पॅरोलवर सुटले आहेत. पॅरोलवरून सुटताच १८ऑक्टोबर रोजी राम रहीमने उत्तर प्रदेशातील बागपत येथे एक व्हर्च्युअल सत्संग आयोजित केला होता. या कार्यक्रमाला हरियाणातील भाजपचे बडे नेते उपस्थित होते. राम रहीमच्या या ऑनलाईन कार्यक्रमाला पंचायत निवडणुकीच्या उमेदवारांनीही हजेरी लावली आणि त्याचे आशीर्वाद घेतले. भाजपच्या महापौरांनी तर पिताजी, आपका आशीर्वाद बना रहे, असे म्हणत त्याचे दर्शन घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्या आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेले गुरमीत रामरहीम सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. तुरुंगाबाहेर येताच त्यांनी सत्संग सुरू केले आहेत. या सत्संगामध्ये करनाल पंचायत निवडणुकीत उभे असलेले अनेक उमेदवार आणि भाजपाचे नेते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या करनाल येथील महापौर रेणू बाला गुप्ता या सुद्धा राम रहीमच्या ऑनलाईन सत्संगात सहभागी झाल्या होत्या. महापौर रेणू यांनी राम रहीम यांचा उल्लेख पिताजी असा केला. त्यानंतर त्यांनी राम रहीम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. पिताजी, तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या. राम रहीम यांनीही त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. तुम्हा सर्वांना भरपूर आशीर्वाद. तुम्ही सर्व जबाबदार आणि महत्त्वाची माणसं आहात. देशाला असंच पुढे न्या. देशाचा लौकीक वाढवा, असं राम रहीम म्हणाले. यावेळी रेणू बाला गुप्ता यांच्यासह भाजपचे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र राणा, उपमहापौर नवीन कुमार आणि राजेश कुमार आदी उपस्थित होते. त्याबरोबरच त्यांनी राम रहीम यांना करनालमध्ये येण्याचं निमंत्रणही दिले आहे.
हरियाणात पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्याचवेळी राम रहीम पॅरोलवर सुटले आहेत. करनाल हा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा मतदारसंघही आहे. दरम्यान, गुरमीत राम रहीम पॅरोलवर सुटणे ही एक रुटीन प्रक्रिया असल्याचं हरियाणा सरकारने म्हटले आहे. येत्या ३ नोव्हेंबर रोजी हरियाणाच्या आदमपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. हा विभाग हिसार जिल्ह्यात येत आहे. या भागात राम रहीमचा चांगला प्रभावहि असल्याची चर्चा आहे. दरम्यान, हत्या, लैंगिक शोषण यांसारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या राम रहीमसमोर भाजपा नेत्यांनी घातलेले दंडवत चर्चेचा विषय ठरले आहे. त्याबरोबरच निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राम रहीमला पॅरोल देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. मात्र या संपूर्ण घटनांशी आपला संबंध नसल्याचे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami