हैदराबाद:- ‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या मैत्री कंपनीच्या मालकासह त्यांच्याशी संबंधित इतरांवर आयटी विभागाने छापे टाकले आहेत. यलमंचिली रविशंकर, नवीन अर्नेनी आणि चेरूकुरू यांच्या कार्यालयांसह पंधरा ठिकाणी ही मोठी कारवाई झाली आहे. मैत्री या निर्मिती कंपनीने पुष्पा, श्रीमंतुडू यांसारख्या तेलुगू चित्रपटांची निर्मिती केली.
आयकर पथकातील अधिकारी हैदराबादला पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी मैत्री फिल्म्सच्या कार्यालयात पोहोचून छापा टाकण्यास सुरुवात केली. प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन याच्या घरापासून छापेमारीची सुरुवात झाली. इतर नामांकित निर्माते अँटनी पेरुंबवुर, अँटो जोसेफ आणि लिस्टिन स्टीफन यांच्याही घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले.या छाप्याबाबत प्राप्तिकर विभागाकडून कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मैत्री प्रॉडक्शनच्या बॅनरखाली अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. नुकतेच मैत्री प्रोडक्शन हाऊसने चिरंजीवी, बालकृष्ण, पवन कल्याण यांसारख्या अनेक अभिनेत्यांना भरघोस रक्कम देऊन मोठ्या चित्रपटांसाठी साईन केले आहेत. साऊथचा सुपरस्टार पवन कल्याणचा ‘उस्ताद’ हा चित्रपट 2023 मध्ये याच बॅनरखाली रिलीज होणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन, मोहनलाल, ममूटी ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील खूप मोठी नावं आहेत. त्यामुळे या कारवाईची विशेष चर्चा होत आहे.