मुंबई- कोरोना रुग्णांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगभरात हे प्रमाण वाढलं असल्याचे निरीक्षण समोर आले आहे परंतु यासोबतच पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयविकार जास्त वाढल्याचे अनेक देशातील निरीक्षणातून समोर आले आहे.
युरोपियन स्ट्रोक ऑर्गनायजेशनच्या संशोधनानुसार कामाचा ताण व झोपेच्या कमतरतेमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हृदयरोग व ब्रेन स्ट्रोक जास्त झाल्याचे आढळून आले आहे तसेच स्वीडनमधल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार कोरोना होऊन गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचा धोका पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना नऊपट अधिक असून भारतामध्ये याबाबत असे संशोधन होणे गरजेचे आहे असे मत आता भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती देताना नवी मुंबईत पहिली हृदयशल्यचिकित्सा केलेल्या शुश्रूषा हार्ट सेन्टरचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर सांगतात, “गेल्या दोन वर्षात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या जास्त असली तरी यामध्ये हृदयविकार झालेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. ऑक्सफर्ड जर्नलने नुकताच यावर अभ्यास केला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या ५० टक्के रुग्णांचे हृदय बरे झाल्यानंतर महिन्याभरानंतर डॅमेज होते. त्यामुळे बरे झाल्यानंतरही हार्ट रेट चेक करत राहणं गरजेचं झालं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावरही रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
भारतामध्ये हृदयविकाराचे प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आढळते, असा एक समज आहे. परंतु, महिलांच्या मृत्यूसाठी सर्वाधिक कारणीभूत ठरणारे कारण हे ‘हृदयविकार’ आहे, हे किती जणांना माहीत आहे? पुरुषांच्या तुलनेत १० वर्षे उशिरा महिलांना हृदयाच्या रक्तवाहिनीचा आजार होतो. पण त्याचे स्वरूप मात्र अधिक गंभीर असते. हृदयविकाराचा झटका आलेल्या अनेक महिलांना याबाबत माहितीच नसते. चाळिशीनंतर घरच्या जबाबदाऱ्या, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे ५४ टक्के महिलांना स्थूलतेचा त्रासात होऊ लागतो. वाढते कोलेस्ट्रॉल, बैठी जीवनशैली व व्यायामाचा अभाव या सर्व कारणांमुळे हृदयविकाराची शक्यता वाढवते. सुमारे ५० टक्के महिलांमध्ये मासिक ऋतुचक्र थांबल्यावर हृदयाशी संबंधित आजाराचे निदान झाल्याचेही एका पाहाणीतून समोर आले आहे. पौष्टिक आहारांचा अभाव, जंकफूडचे अतिसेवन, अपुरी झोप, नोकरीनिमित्त होणारा प्रवास, मधुमेह, व्यायामाचा अभाव यामुळे महिलांमध्ये गेल्या दहा वर्षांत हृदयविकाराच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे.
“कोरोना व हृदयविकार याविषयी अधिक माहिती देताना कल्याण येथील साई स्वस्तिक हॉस्पिटलचे संचालक डॉ. तुषार ठेंगने म्हणाले, ” हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग म्हणजे सीव्हीडी हे भारतात मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी किंवा रक्ताभिसरण प्रणाली हृदय, धमन्या, शिरा आणि रक्तवाहिन्या बनलेली असते. यासंबंधित कोणत्याही समस्येला सीव्हीडी म्हणतात. अशा प्रकारे, सीव्हीडी हा हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित अनेक रोगांचा समूह आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग हा थेट फुफ्फुसावर आघात करतो. त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होऊ ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. काही रुग्णांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेचा हृदयावरही परिणाम होऊ शकतो. अशावेळी ऑक्सिजनयुक्त रक्त पम्प करण्यासाठी हृदयाच्या स्नायूंवर म्हणजेच धमन्यांवर अधिक ताण येतो. याचा थेट परिणाम हृदयाच्या पेशींवर होतो व ह्रदयविकार वाढीस लागतात. बीपीचे रुग्ण, डायबेटिक रुग्ण आणि स्थूल व्यक्तींमध्ये कोव्हिड-१९ आजारामध्ये हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता जास्त असते.