पुणे – शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी महापालिका प्रयत्न करते. असे असताना दुसऱ्या बाजूला पाळीव कुत्री रस्ता, पादचारी मार्ग आणि गार्डनमध्ये घाण करतात. याला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने पाळीव कुत्र्यांच्या मालकांना ५०० रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यात जवळपास ८० हजार पाळीव कुत्री आहेत. मात्र त्यापैकी केवळ साडेपाच हजार कुत्र्यांची पालिकेकडे नोंदणी आहे. त्यांच्या मालकांनी परवाना घेतला आहे. पाळीव कुत्र्यांचे मालक दररोज सकाळी, संध्याकाळी कुत्र्यांना फिरायला आणतात. त्यांना रस्ता, पदपथ आणि गार्डनमध्ये विष्ठा करायला लावतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो. शहरही अस्वच्छ होते. त्यामुळे पाळीव कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर त्याच्या मालकाला ५०० रुपयांचा दंड ठोठवण्याचा आदेश महापालिकेच्या घनकचरा विभागाने काढले आहेत. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास पाळीव कुत्र्यांच्या मालकांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे.