पुणे- वानवडीतील शिवरकर वस्तीत गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात पत्र्याची अनेक घरे जळून खाक झाली. नागरिक वेळीच घराबाहेर पडल्यामुळे आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. अग्निशामन दलाच्या जवानांनी ६ पाण्याच्या बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.
वानवडीत शिवरकर दवाखान्यासमोर शिवरकर वस्ती आहे. तेथे पत्र्याची घरे आहेत. त्यात अनेक जण राहतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास या वस्तीला आग लागली. आगीच्या झळांनी झोपलेल्या नागरिकांना जाग आली. ते घाबरून घराबाहेर पळाले. काही जणांनी घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र त्यानंतरही ही आग भडकली. आगीची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे जवान ६ फायर इंजिनसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अनेक तास शर्तीची झुंज देऊन आगीवर नियंत्रण मिळवले. येथील एका खोलीत मंडपाचे सामान होते. त्या खोलीला आग लागली आणि ती बाजूच्या घरांमध्ये पसरली. आगीत कष्टकऱ्यांचे संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजले नाही, असे अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.