पुणे- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर हवेली तालुक्याऐवजी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात येणार आहे. त्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या समितीच्या सदस्यपदी वर्णी लावण्यासाठी पुणे जिल्ह्यातील मातब्बर मंडळींनी जोरदार बिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. २००३ पासून समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ आलेले नाही. शिंदे-फडणवीस सरकारनेही निवडणुका घेण्याऐवजी तेथे आपल्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुळची हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यावरील निवडणुका राजकीय दृष्टिकोनातून लांबवण्यात आल्या. त्यामुळे बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नेमण्याचा विक्रम झाला आहे. निवडणुका लांबवण्यासाठी समितीच्या नावात बदल करणे हा एकमेव अजेंडा ठेवून काम केले जात आहे. हवेली आणि सध्याच्या पुणे बाजार समितीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. राज्यातील सत्तांतरामुळे प्रशासक आणि प्रशासकीय मंडळ नेमून या समितीच्या निवडणुका लांबवणे बहुतेक पक्षांनी पसंत केले. मुंबईनंतर पुणे बाजार समितीचा क्रमांक लागतो. त्यामुळे या बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळ सदस्यपदासाठी बड्या व्यक्तींनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी बड्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पणन मंत्रीपदाचा कार्यभार आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपच्या गटातील खासदार व आमदार आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.