पुणे- पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूक कोंडीमधून मार्ग काढण्यासाठी एलिव्हेटेड कॉरिडॉरची मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली होती; ती मान्य होऊन सहापदरी रस्त्याऐवजी १२ पदरी रस्ता मंजूर झाल्याची माहिती पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी दिली आहे.
या महामार्गावर वाढणारी प्रचंड वाहतूक व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हा विषय मागील काही वर्षांत अत्यंत जटिल झाला आहे.उत्तर पुणे जिल्ह्यातील नाशिक, संगमनेर,आळेफाटा तसेच नारायणगावकडून येणारे व चाकण औद्योगिक क्षेत्राच्या प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे या रस्त्यावर प्रचंड ताण निर्माण झालेला आहे.दररोज नागरिक वाहतूक कोंडीला सामोरे जात आहेत.२००४ मध्ये चारपदरी रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यावर कोणतेही नियोजन झाले नाही.२० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर या महामार्गावर वाहनांची संख्या वाढली. दोन वर्षांपूर्वी सहापदरी रस्त्याचे नियोजन इंद्रायणी नदी ते राजगुरुनगर, असे करण्यात आले होते.६४० कोटींची निविदा प्रक्रिया त्यावेळी रद्द करण्यात आली.
दरम्यान, चाकण चौकातील उड्डाणपूल सोडला तर यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून काही मार्ग निघेल, अशी परिस्थिती नसल्यामुळे एलिव्हेटेड कॉरिडॉरची मागणी महामार्गाचे समन्वयक दिलीप मेदगे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली होती.ती मान्य होऊन सहापदरी रस्त्याऐवजी १२ लेनचा रस्ता मंजूर झाला.सध्या यामध्ये अजून महत्त्वाचा बदल करण्यात आला असून नाशिक फाटा ते मोशी या दहा किलोमीटर लांबीमध्ये ६० मीटर रुंदीने जमीन अधिग्रहण केलेली असल्याने या जमिनीवर सहा लेन व दोन सेवारस्त्यांच्या चार लेन, अशा एकूण दहा लेन तसेच उड्डाणपुलावर आठ लेन व त्याच उड्डाणपुलाच्या दुसर्या मजल्यावर २४.१०मीटरमध्ये सहा लेन,दुसर्या मजल्यावर पुलाचे प्रस्तावित नियोजन करण्यात येत आहे.सध्याच्या निविदा प्रक्रियेमध्ये त्याचा समावेश होणार आहे.