पुणे:- मानधनात भरीव वाढ करावी, अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप, नवीन चांगला मोबाईल आदी मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी सेविका मागील तीन दिवसांपासून संपावर आहेत. संपाच्या तिसऱ्या दिवशी पुणे जिल्हा परिषद व आयसीडीएस विभागीय उप आयुक्त यांच्या कार्यालयांवर सुमारे २००० अंगणवाडी सेविकांनी तीव्र निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी व उप आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
या संपाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या अ.भा. जनवादी महिला संघटनेच्या नेत्या सरस्वती भांदिर्गे आणि सीटू जिल्हा अध्यक्ष कॉ. अजित अभ्यंकर यांनी भाषण केले . जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी व आयसीडीएस विभागीय उपायुक्त यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. दरम्यान अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदानावर २८ फेब्रुवारी पासून बेमुदत ठिय्या आंदोलनात सुरु होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अंगणवाडी सेविका संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.