पुणे – प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे पीएमपीएलने ग्रामीण भागातील ११ मार्गांवरील बस सेवा उद्या रविवारी २६ नोव्हेंबरपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका या मार्गावरील नियमित प्रवाशांना बसणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जादा बस चालवण्यात येणार आहेत.
कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण मार्गांवरील पीएमपीएलची सेवा बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानुसार ११ मार्गांवरील बस सेवा उद्यापासून बंद केली जाणार आहे. यामुळे येथील नियमित प्रवाशांची गैरसोय होणार आहे. शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत असल्याने तेथे जादा बस सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट ते काशिंग गाव, स्वारगेट-बेलावडे, कापूरहोळ-सासवड, कात्रज-विंझर, सासवड-उरूळी कांचन, हडपसर-मोरगाव, हडपसर-जेजुरी, मार्केटयार्ड-खारावडे, वाघोली-राहूगाव पारगाव, चाकण-शिक्रापूर फाटा आणि सासवड ते यवत या ११ मार्गांवरील पीएमपीएलची बस सेवा उद्या रविवारपासून बंद होणार आहे.