पालघर – जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या स्थितीमध्ये आहेत.शासन नियमानुसार या शाळांमधील पटसंख्या २० पेक्षा कमी असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.या जिल्ह्याच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक शाळांची पटसंख्या तर अवघी ५ ते १० इतकी कमी आहे.
जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत. पण याच शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ५ ते १० इतकी आहे.कारण यापदा वस्तीवरील बहुतांशी कुटुंबे वर्षातील सहा ते सात महिने रोजगारासाठी तात्पुरते स्थलांतरीत झालेले असतात.त्यामुळे शाळांमधील पटसंख्या इतकी कमी असे.तसेच काही शाळांमध्ये केवळ दोन शिक्षकच काम करत असल्याचे चित्र दिसत आहे. पण शासनाच्या पटसंख्येचा निकष लावला तर या शाळा बंद पडतील आणि या आदिवासी मुलांचे शैक्षणिक भविष्य अंधारात लोटले जाईल अशी भीती आदिवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवा संघटनेचे प्रवक्ते संतोष साठे यांनी तर शासनाने या शाळा बंद केल्या तर अन्ही त्यास रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करू असा इशारा दिला आहे.पाड्यावरी या शाळा बंद केल्या तर या विद्यार्थ्यांना पाड्यापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी धडपड करावी लागेल. डोंगर कपारी,लहान,मोठे नाले आणि दाट जंगलातून हे विद्यार्थी शाळेसाठी कसे मार्गक्रमण करतील असा सवाल आदिवासी संघटनेचे संतोष साठे यांनी केला आहे.