संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष
परवेझ मुशर्रफ यांचे निधन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांचे दुबईत निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. 2001 ते 2008 या काळात ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते. मुशर्रफ हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
पाकिस्तानचे माजी लष्करी हुकूमशहा परवेझ मुशर्रफ हे मार्च 2016 पासून दुबईत राहत होते. पाकिस्तानमध्ये परतल्यास अटक करण्यात येईल, या भीतीने मुशर्रफ पुन्हा मायदेशी परतलेच नाहीत. मुशर्रफ यांना हृदय आणि इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन महिने मुशर्रफ यांच्यावर दुबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल मुशर्रफ यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मुशर्रफ यांना आजारातून सावरणे कठीण आहे. त्यांचे अवयव निकामी होत आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांनी केली होती. अखेर आजाराशी झुंज देत असताना आज शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. 78 वर्षीय मुशर्रफ यांनी 1999 ते 2008 पर्यंत पाकिस्तानवर राज्य केले. परवेझ मुशर्रफ यांचा जन्म 11 ऑगस्ट 1943 रोजी नवी दिल्लीतील दर्यागंज येथे झाला होता. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर मुशर्रफ यांचे कुटुंब फाळणीच्या एक दिवसापूर्वीच पाकिस्तानात गेले. मुशरर्फ हे 1961 मध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमीत रुजू झाले. त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीकडे पाहता त्यांची सैन्यदलात बढती झाली. मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्रपती असण्यासोबतच पाकिस्तानी लष्कराचे प्रमुखही राहिले होते. कारगिल युद्धासाठी मुशर्रफ यांना थेट जबाबदार धरले जाते. 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची हकालपट्टी करून ते सत्तेवर आले आणि 2008 पर्यंत सत्ता सांभाळली. परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली होती. परवेझ मुशर्रफ यांच्यावर देशात आणीबाणी लागू केल्याबद्दल आणि डिसेंबर 2007 च्या मध्यापर्यंत राज्यघटना निलंबित केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 31 मार्च 2014 रोजी मुशर्रफ यांना दोषी ठरवण्यात आले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami