मुंबई – पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल व रेल्वे मार्गांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल विलंबाने धावणार असून काही फेऱ्या रद्द होणार आहेत. मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे, गोरेगाव सेवा बंद राहणार आहे. कुर्ला ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत, असे रेल्वेने पत्रकात म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानका दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर उद्या रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे धीम्या लोकल जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल फेऱ्या रद्द केल्या असून लोकल विलंबाने धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दादर ते ठाणे दरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल रद्द केल्या असून काही विलंबाने धावणार आहेत. हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे आणि गोरेगाव दरम्यानची अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. या काळात कुर्ला फलाट क्रमांक ८ वरून पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान रेल्वे उड्डाण पुलावर गार्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री २.०५ ते पहाटे ३.३५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेने दिली.