पुणे- महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या दोन अध्यक्षांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांना त्या जागी नियुक्त करण्यात आले. अशातच शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना त्यांनी राज्यातील ४५ शिक्षकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी दराडेंसह त्यांच्या भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
शैलजा दराडे या परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत, तर, दादासाहेब दराडे हे त्यांचे भाऊ आहेत. दादासाहेब दराडे यांनी त्यांची बहीण शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आहे असे, सांगून पोपट सूर्यवंशी यांचा विश्वास संपादन केला व त्यांच्या दोन नातेवाईकांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले. परंतू, त्यांना आजपर्यंत नोकरी लावली नसल्याने सूर्यवंशी यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी दोघांचेही पैसे परत केले नाहीत.
हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता. या प्रकरणी सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली असून हडपसर पोलिसांनी शैलजा आणि दादासाहेब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात या दोघांसमवेत इतर ४४ जणांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.