संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांमध्ये १ ऑक्टोंबरपासून मतदार नोंदणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- औरंगाबाद, नागपूर आणि कोकण या विभागांमधील शिक्षक मतदार संघ आणि नाशिक व अमरावती येथील पदवीधर मतदारसंघांची निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोंबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिक्षक आणि पात्र पदवीधर मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. या मतदारांनी त्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले.

पुढील वर्षी राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मतदार नाव नोंदणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ऑक्टोंबरपासून मतदार नोंदणीसाठी अर्ज करता येतील. ७ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, असे मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघांची दर ६ वर्षांनी निवडणूक होते. या निवडणुकीसाठी शिक्षक आणि पात्र पदवीधरांना प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करावी लागते. पदवीधर मतदारसंघासाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे अगोदर कोणत्याही शाखेची पदवी घेतलेला नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र ठरतो. अर्ज क्रमांक १८ भरून अशा पदवीधरांना मतदार म्हणून नोंदणी करता येते. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयात हे अर्ज उपलब्ध आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावरही हे अर्ज आहेत. त्यानुसार पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. एकगठ्ठा आलेल्या अर्जांचा मतदार नोंदणीसाठी विचार केला जाणार नाही. पदवीधर आणि शिक्षक मतदारांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबरपर्यंत हरकती आणि आक्षेप नोंदवता येतील. २५ डिसेंबर २०२२ ला त्यावर सुनावणी होईल. अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami